🧿🧿ज्येष्ठ खो-खो सांख्यिकीतज्ज्ञ
रमेश वरळीकर यांचे निधन 🧿🧿
🔶खो-खो क्रीडा प्रकारातील ज्येष्ठ सांख्यिकीतज्ज्ञ रमेश माधवराव वरळीकर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ८३व्या वर्षी माहीमच्या सुखदा नर्सिग होम रुग्णालयामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.
🔶खो-खोसाठी महत्त्वपूर्ण सांख्यिकी गोळा करण्यात वरळीकर यांचा हातखंडा होता. परंतु प्रशिक्षक म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. दादरच्या लोकसेना मुलींच्या संघाचे यशस्वी प्रशिक्षक म्हणून त्यांना ओळखले जायचे. राष्ट्रीय खेळाडू डॉ. हेमा नेरवणकर, प्रतिभा गोखले, रेखा राय, दिनेश परब यांसारखे नामांकित खेळाडू घडवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
🔶१९७० पर्यंत त्यांनी खो-खोचे प्रशिक्षण देण्याचे कार्य केले. त्याशिवाय वरळीकर हे मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाचे पदाधिकारी होते. त्यांनी अनेक सामन्यांत पंच म्हणूनही काम केले. भाई नेरुरकर चषकापासून अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये त्यांनी व्यवस्थापकाचीही भूमिका बजावली.
🔶१९७०नंतर वरळीकरांनी खऱ्या अर्थाने खो-खोमधील प्रत्येक खेळाडूची आणि स्पर्धेची सांख्यिकी गोळा करण्याचे कार्य हाती घेतले. त्यासाठी त्यांनी खो-खोच्या नोंदींचे पुस्तक लिहितानाच सांख्यिकीविषयक पुस्तकही लिहिले. वरळीकरांनी खो-खोविषयी एकंदर १४ पुस्तके लिहिली. एखाद्या सामन्यात एखाद्या संघाने किती ‘खो’ दिले अथवा किती वेळा नियमोल्लंघन केले, याची ते अद्ययावत माहिती ठेवायचे. वरळीकरांच्या आग्रहास्तव महाराष्ट्र खो-खो संघटनेमध्ये सांख्यिकीचा विभाग सुरू करण्यात आला. यासाठी अरुण देशपांडे, मनोहर साळवी यांनीही त्यांना सहकार्य केले.
Comments
Post a Comment